शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला ?

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला असा प्रश्न मला नेहमीच पडत असतो .कारण हजारो शेतकरी बांधव दरवर्षी या ना त्या कारणाने आत्महत्या करत आहेत .हे आत्महत्या करण्याचे सत्र  थांबण्याचे नाव घेत नाही ....

धर्मा पाटील यांचा संघर्ष 2009 ते 2014 दरम्यानचा. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता त्या काळात होती. आणि तेव्हा त्यांना न्याय मिळाला नाही.

धर्मा पाटील हे धुळे जिल्ह्यातल्या विखरण गावातले शेतकरी. 2015 साली औष्णिक वीज प्रकल्पासाठी त्यांची 5 एकर जमिन संपादित करण्यात आली. 5 एकर बागायती शेतीचा मोबदला मिळाला केवळ 4 लाख रुपये.  ही भरपाई इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत फार कमी होती. त्यामुळे वयोवृद्ध धर्मा पाटील यांनी योग्य भारपाईसाठी पाठपुरावा सुरू केला. मात्र गेंड्याची कातडी असलेली यंत्रणा जागी होईल तर शपथ.
आणि आता भाजपा सरकारच्या काळातही त्यांना न्याय मिळाला नाही .यंत्रणांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं धर्मा पाटील यांनी टोकाचं पाऊल उचललं.

22 जानेवारीला त्यांनी मंत्रालयातच विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आणि आज त्यांचा मृत्यु झाला .

एकंदरीतच काय तर इथल्या  शेतकर्यांस मदत तर सोडाच परंतु त्यांच्या हक्काचे पैसे ही मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करण्याची वेळ येते . किती मोठी दुर्दैवाची बाब ...कधी कर्जबाजारी पणामुळे ,कधी शेतातील पिके जळुन गेल्याने अशा या ना त्या कारणांनी शेतकरी आत्महत्या होतच आहेत . सरकार म्हणून कोणत्याही आजवर कोणत्याच सत्ताधार्यांना शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात यश आले नाही . ही मोठीच शोकांतिका आहे . मात्र शेतकरी आत्महत्येचा नेहमीच राजकीय मुद्दा केला जातो .मग आरोप -प्रत्यारोप होतात विरोधक अगदी घसा फाडुन ओरडणार .सत्ताधारी टोलवाटोलवा करणार शेतकऱ्यांच्या कुटुंबास थोडीसी सरकारी मदत .आणि पुन्हा वातावरण जैसे थे .
आणि मग नंतर एखादा शेतकरी आत्महत्या करणार आणि मग पुन्हा आरोप -प्रत्यारोप ..
हे असेच चालु राहणार ...
शेतकरी म्हणजे माणूस नाही अशीच इथल्या राज्यकर्त्यांची भावना असावी .एखादा वन्यप्राणी मारला तर किती कडक शिक्षा होते ..मग इथल्या हजारो भुमिपुत्रांना आत्महत्या करण्याची वेळ येत आहे . मग इथल्या आजवरच्या सर्वच सत्ताधार्यांवर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांसाठी दोषी धरुन गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत ...?

टिप्पण्या