विठु नामाचा जप करत अवघड रोटि घाट होतो सहज पार..

आज सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा जरा लवकरच उठलो  कारण ही तसेच होते . आज माझ्या पाटस गावात जगदगुरु संत तुकोबारायांच्या पालखीचे आगमन होणार होते . पालखी सोहळा  गावात येणार यामुळे उत्साह वाटत होता .
गावात पालखी फक्त दोनच तास ग्रामदैवत श्री नागेश्वर महाराजांच्या मंदिरात विसावा घेते आणि नंतर रोटी घाटाकडे पालखीचे प्रस्थान होते . जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील रोटी घाट हा सर्वात अवघड टप्पा समजला जातो . सध्याच्या काळातील वाहनांसाठी हा घाट पार करणे अवघड नाही . परंतु पालखी रथ हा आज ही बैलांच्या साह्याने ओढला जातो . घाटातील चढण , तीव्र वळणे यांमुळे रोटी  घाट हा संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यातील अवघड टप्पा आहे . हा टप्पा पार करताना मोठी कसरत करावी लागते . रथाला अनेक बैलजोड्या जोडल्या जातात . हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आजुबाजुच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणावर येत असतात .

पाटस गावातील खुप लोक पालखी सोहळा रोटी घाटाच्या वर पोहचवण्यास येत असतात . तसाच मी ही आलो होतो . दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पालखी घाटाच्या पायथ्याला आली . तेथे पालखी रथास आणखी पाच बैलजोड्या जोडण्यात आल्या.  पाटस परिसरातील आणि पुणे जिल्ह्यातील काही हौशी शेतकरी रोटी घाट पार करण्यासाठी पालखी रथास जुंपण्यासाठी बैलजोड्या घेऊन येतात . आपली बैलजोडी संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथास जोडले जाणे ही शेतकऱ्यांसाठी अभिमानाची बाब आहे.
पालखीला ज्यादा बैलजोड्या जोडल्यानंतर पालखीने रोटी घाट चढण्यास सुरुवात केली . बैल जोड्यांबरोबरच वारकरी , भाविक देखिल पालखी रथ पुढे ढकलण्यासाठी जोर लावत होते . घाटातील तीव्र चढ चढण्यासाठी पालखी जागोजागी थांबवून , थोडी विश्रांती घेऊन जोमाने पुढे नेण्यात येत होती .

संपूर्ण  रोटी घाट वारकर्यांनी भरुन गेला होता .टाळ - मृदुंगाचा गजरात वारकरी विठ्ठल नामाचा जयघोष करीत ,तुकोबारायांचे अभंग गात , नाचत रोटी घाटात चालत होते . संपूर्ण रोटी घाटात टाळ -मृदुंगाचा मनोहरी आवाज घुमत होता .भगव्या पताका खांद्यावर घेतलेले वारकरी तर डोक्यावर तुळशीवृंदावन आणि विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती घेऊन निघालेल्या महिला वारकरी वळणदार घाटातून मार्गस्थ होत असतानाचे दृश्य नयनमनोहरी होते.  पालखी रोटी घाट पार करीत असताना हा सोहळा पाहण्यासाठी डोंगरांवर भाविकांनी मोठी गर्दी केली होती .
एवढा अवघड टप्पा असुनही वारकर्यांचा उत्साह ओसांडुन वाहत होता . वारकरी रोटी घाटात फुगडी चा फेर धरत , अभंगाच्या तालावर नाचत होते . वारकर्यांत अनोखा उत्साह यावेळी दिसुन आला . रोटी घाट चालत पार करायचा असेल  तर तरुण दमतात . परंतु हे सर्व वैष्णव संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोबत वरवंड गावाहून चालत पाटस येथे आले आणि पाटस वरून रोटी घाट पार करीत होते . जवळपास १० की . मी अंतर चालून नंतर रोटी घाटाची अवघड चढण वयोवृद्ध वारकरी सहज पार करीत होते .  विठु नामाचा जप करत , विठ्ठलाच्या भक्तित तल्लीन झालेल्या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीने दुपारी १वाजण्याच्या सुमारास संत तुकाराम महाराजांच्या पालखीने रोटी घाट पार केला .रोटी घाट पार केल्यानंतर  घाट माथ्यावर पालखीची अभंग आरती करण्यात आली .
रोटी घाट पार केल्यानंतर कोणत्याही वारकर्यांच्या चेहर्यावर थकवा दिसत नव्हता .  सर्वांच्या चेहऱ्यावर उत्साह दिसत होता.  तरुण वारकर्यांचे ठिक आहे . ते तरूण आहेत . त्यांच्या अंगात शक्ती आहे . असं समजलं तरी  ६० टक्के पेक्षाही जास्त वयोवृद्ध वारकरी दिसत होते .  सरळ उभा राहता येत नाही , नीट चालताही येत नाही .अशा अवस्थेत हि वयोवृद्ध वारकरी रोटी घाटासारखा अवघड टप्पा चालत पार करताना पाहिले .
बरं ते मोकळे चालत नाहीत तर कोणी टाळ , मृदंग वाजवत , कोणाच्या हातात विणा आहे तर कोणी हातात कपड्यांच्या पिशव्या घेतलेल्या अशा अवस्थेत चालण सुरूच . हे सर्व पाहुन या वारकऱ्यांच्या अंगात एवढी शक्ती कोठुन येत ? असा प्रश्न मनात  उभा राहतो . विठ्ठलाच्या भक्तीने  , विठ्ठलाच्या भेटीसाठी असलेल्या आतुरतेमुळेच हे शक्य होत असावं असं वाटतं .


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेतकरी जन्माला येतो तो जगायला की आत्महत्या करायला ?